घरासमोर झाडू मारत असलेल्या महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ: सक्करदरा ठाणे हद्दीतील घटना

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरासमोर झाडू मारत असलेल्या महिलेची सोनसाखळी हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी ॲक्टिवा गाडीवरून पळ काढला. पीडित महिलेने याबाबत तात्काळ सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एक आरोपीस अटक केली, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव टिपूसुलतान अशपाक शेख असे असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी तसेच महिलेकडून हिसकावलेली सोनसाखळी पोलिसांनी जप्त केली आहे.
आणखी दोन गुन्ह्यांचा उलगडा
या कारवाईदरम्यान पोलिसांनी केवळ चेन स्नॅचिंग प्रकरण सोडवले नाही तर आरोपीच्या माध्यमातून आणखी दोन गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलिसांकडून सुरू असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.


