गोपनीयतेचा भंग; पांचपावलीत सीसीटीव्ही फुटेज वापरून तरुणी छळप्रकरणी शेजारी अटकेत

नागपूर :पांचपावली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका रहिवासी सोसायटीतील तरुणीला सतत त्रास देत तिचे आणि तिच्या आईचे छायाचित्रे काढून ती सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाकल्याप्रकरणी शेजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यामुळे पीडित तरुणीच्या शिक्षणावर परिणाम झाला असून संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आले आहे.
ही घटना पांचपावलीतील एका हाउसिंग सोसायटीतील आहे. 47 वर्षीय फिर्यादी महिलेने आपल्या शेजारी राहत असलेल्या हरजेंद्र नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, हरजेंद्रने सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गैरवापर करून पीडित महिले व तिच्या मुलीचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय काढले. त्यानंतर हे फोटो सोसायटीच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये टाकून कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे पीडित कुटुंबाला प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागला. मुलीच्या शिक्षणावरही याचा थेट परिणाम झाला असून ती भीती व लाजेखाली दिवस घालवत आहे. अखेर पीडित कुटुंबाने धैर्य दाखवून पोलिसांकडे धाव घेतली.
पांचपावली पोलिसांनी तक्रार नोंद घेत आरोपीविरुद्ध छेडछाड, मानसिक त्रास देणे व गोपनीयतेचे उल्लंघन अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.




