जाहिरात, TV सिरीयल व मॉडेलिंगच्या नावावर इव्हेंट ऑर्गनायझर युवकाने २ डझन लोकांची केली फसवणूक; सोनं, रोकड उकळून बेपत्ता, अखेर गुन्हा दाखल

नागपूर :
मोमीपुरा कब्रस्तान रोड येथील कसिफ खान उर्फ रुषान खान या युवकाने इव्हेंट ऑर्गनायझर कंपनीच्या नावाखाली तब्बल दोन डझन लोकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मॉडेलिंग, फॅशन शो, जाहिरात व चित्रपटांत काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांकडून लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने उकळले. पीडितांच्या तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी त्याच्यावर BNS 316(2), 318(4), 351(2), 352 या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
नगमा निजामुद्दीन शेख या राजीव गांधी नगर येथील रहिवाशाच्या तक्रारीनुसार, तीन वर्षांच्या मुलीला कसिफ खानच्या फॅशन शोमध्ये उतरवण्यात आले होते. त्या शोमध्ये मुलीला प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर खानने मुलीला मुंबईत जाहिरात व चित्रपटात संधी मिळवून देण्याचे सांगत मोठी रक्कम मागितली. नगमा यांच्याकडे रोकड नसल्याने त्याने सोन्याची मागणी केली. नगमा त्याच्या बोलण्याला बळी पडून तब्बल १३ तोळे सोनं दिलं. मात्र, सहा महिने उलटून गेले तरी काम न मिळाल्याने त्यांनी आपले दागिने परत मागितले असता, खानने सोनं ज्वेलर्सकडे गहाण ठेवल्याचे व ते चोरीला गेल्याचे कारण देत उलटसुलट उत्तरे दिली.
दरम्यान, इंस्टाग्रामवर एका मुलीने थेट प्रक्षेपणाद्वारे कसिफ खान हा मोठा फसवणूक करणारा असल्याचा खुलासा केला. तो विशेषत: मुलींना सॉफ्ट टार्गेट करून मॉडेलिंग, शो व परदेशात संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवतो आणि त्यानंतर त्यांना धमक्या देऊन, शिवीगाळ करून पैसे परत करण्यास नकार देतो, असे सांगण्यात आले.
यानंतर नगमा शेख यांच्या संपर्कात मुंबई, भंडारा, गोंदिया, छत्तीसगडमधील भिलाईसह सुमारे २० पीडित आले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसीम खान यांच्या हस्तक्षेपाने हा मुद्दा पुढे आला. चौकशीत एक महिलेकडून रेल्वे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली दोन लाख, भिलाईतील शान अली नावाच्या युवकाकडून एमटीव्ही शो मिळवून देण्यासाठी तीन लाख, भंडाऱ्यातील एका युवतीकडून गोव्यातील शोसाठी १.६ लाख, तसेच मुंबई व नागपूरातील अनेक मुलींकडून एक ते तीन लाख रुपये घेऊन फोन ब्लॉक केल्याचे उघड झाले.
२२ सप्टेंबर रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या पी.आय. शुभांगी देशमुख यांनी सर्व पीडितांची बाजू ऐकली. त्यानंतर त्यांची भेट डीसीपी मदने यांच्याशी घडवून आणली. मदने यांनी प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने कारवाईचे आदेश दिले. अखेर नगमा शेख यांच्या तक्रारीवरून उशिरा रात्री कसिफ खान उर्फ रुषान खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.




