जेलबाहेर ‘डॅडी’: अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन, नागपूर जेलमधून सुटका

नागपूर | प्रतिनिधी
कुख्यात गँगस्टर आणि एकेकाळचा अंडरवर्ल्डचा डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ याला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून, त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून गुरुवारी सकाळी सुटका करण्यात आली.
गवळी सध्या मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे नेते कमलाकर जामसांडेकर यांच्या २००७ मधील हत्येच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. याप्रकरणी गवळीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याला काही अटींसह जामीन मंजूर केला.
सुटकेनंतर नागपूर पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गवळीला नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर नेण्यात आले. तेथून तो पुढील प्रवासासाठी मुंबईकडे रवाना झाला. विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अरुण गवळी हा एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डमधील प्रभावशाली नावांपैकी एक मानला जात होता. त्यानंतर त्याने गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडून राजकारणात प्रवेश केला. ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाची स्थापना करत तो आमदारही झाला होता. मात्र, जामसांडेकर हत्या प्रकरणात दोषी आढळून आल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.
गवळीला मिळालेला जामीन म्हणजे कायदेशीर लढाईतील मोठा टप्पा मानला जात असला तरी त्याच्या सुटकेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील गुन्हेगारी राजकारणावर चर्चेची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.


