खंडहरात आढळला ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह

नागपूर : नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टी.बी. वॉर्ड क्रमांक ४२ आणि ४४ यांच्या दरम्यान असलेल्या खंडहरामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी उघडकीस आली.
स्थानिक नागरिकांना खंडहराजवळून तीव्र दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान पोलिसांना अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह अत्यंत विघटित अवस्थेत आढळून आला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक काही दिवसांपासून परिसरात बेवारस अवस्थेत फिरताना दिसत होता. प्राथमिक तपासात मृत्यूला दोन-तीन दिवस उलटले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेची माहिती सुरक्षा रक्षक पवन धनराज राऊत यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शव ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.
सध्या मृतकाची ओळख पटलेली नसून, इमामवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




