खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने यंदा प्रथमच *“शिववैभव किल्ले स्पर्धे”*चे आयोजन,२० ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार नोंदणी

नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने यंदा प्रथमच *“शिववैभव किल्ले स्पर्धे”*चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी २० ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांविषयी अभिमान, इतिहासाची जाण आणि सांस्कृतिक परंपरेची जपणूक नवी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित होत आहे.
सदर उपक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राबविला जात असून कला, साहित्य, संस्कृती आणि परंपरेच्या प्रसारासाठी दरवर्षी अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धेत शिवकिल्ले, ऐतिहासिक किल्ले आणि काल्पनिक किल्ले असे तीन विषय ठेवले गेले आहेत. स्पर्धा संस्थात्मक आणि खुल्या गटात पार पडणार असून इच्छुकांना दोन ते तीन दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाईल.
२५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान परीक्षकांद्वारे किल्ल्यांचे परीक्षण केले जाणार आहे. पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यास विशेष प्रोत्साहन दिले जाईल. विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे ₹५१,०००, द्वितीय ₹३१,०००, तृतीय ₹२१,००० तसेच पाच प्रोत्साहनपर प्रत्येकी ₹५,००० अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.




