कोराडी मंदिरात ५५५१ घट स्थापना,नवरात्रोत्सवाच्या तयारीला अंतिम रूप

नागपूर, प्रतिनिधी : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार, यावर्षी विक्रमी ५५५१ घटांची स्थापना करण्यात येणार असून भाविकांना अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मध्य भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे कोराडी मंदिर हे दरवर्षी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ठरते. यावर्षी होणाऱ्या विक्रमी घटस्थापनेमुळे नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा उत्सव पार पडणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समिती, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुरक्षा, वाहतूक व दर्शन व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन केले गेले आहे.
भक्तांसाठी सुविधा
दररोज सकाळ व संध्याकाळ महाआरती आणि धार्मिक कार्यक्रम
पारंपरिक तसेच आधुनिक रोषणाईने मंदिर परिसर सजविला
गेट क्रमांक २ वरून १०० रुपयांच्या दानपावतीवर सुलभ दर्शन व्यवस्था
२५० सीसीटीव्ही कॅमेरे व अनाउन्समेंट प्रणालीद्वारे सुरक्षा नियंत्रण
दिव्यांग, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था
हजारो अखंड ज्योतींमुळे मंदिर परिसर उजळून निघणार
कोराडी मंदिर हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण नसून आता नागपूर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित झाले आहे.




