लेआउट व गाडी विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणारा आरोपी अखेर जयपूर मधून अटक, ३ वर्षांपासून होता फरार
पुणे, मुंबई ते कर्नाटक; विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल

नागपूर : लेआउटच्या नावावर तसेच वाहनांच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर नागपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला जयपूर (राजस्थान) येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपीविरुद्ध महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक राज्यातही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
लकडगंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव पखर शिक्षरकिशोर तिवारी व नीता शिक्षरकिशोर तिवारी, रा. भिलगाव असे आहे. आरोपी गाडी खरेदी-विक्रीच्या व्यवसायाच्या आड फसवणुकीचे जाळे उभारत होता. तो खोटे कागदपत्र तयार करून ग्राहकांची फसवणूक करत असे.
नागपूर शहरातील अनेक पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध २०२२ पासून गुन्हे नोंदवले गेले आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके मागील तीन वर्षांपासून सतत प्रयत्नशील होती. अखेर जयपूर येथे पोलिसांनी यशस्वी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
सध्या आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या अटकेमुळे मोठ्या फसवणूक प्रकरणांचा तपास पुढे गतीने होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



