मानकापुर अपघात दुर्घटनेनंतर RTOची धडक कारवाई : ३७ शाळेच्या बस-व्हॅनवर ई-चलान, ६ वाहन जप्त

नागपूर : मानकापुर फ्लायओव्हरवर झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा व व्हान चालकाचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शाळेच्या वाहनांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ शाळा बस व व्हॅनवर ई-चलान जारी करण्यात आले असून ६ वाहनं थेट जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
शनिवारी RTOच्या पथकाने विविध शाळांमधील सुमारे ३५ बस व व्हॅनची तपासणी केली. तपासणीत धक्कादायक बाब समोर आली की अनेक वाहनं फिटनेस सर्टिफिकेट व आवश्यक कागदपत्रांशिवाय विद्यार्थ्यांची ने-आण करत होती. सुरक्षेच्या नियमांची उघड उघड पायमल्ली होत असल्याने तत्काळ कारवाई करण्यात आली.
या मोहिमेतून एकूण ४८ हजार रुपयांहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर RTOने शाळा बस, व्हॅन, ऑटो व विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहनांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.
RTOच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही मोहीम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबवली जात असून येत्या दिवसांत तपासणी आणखी कडक केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येऊ नयेत, हाच या कारवाईचा उद्देश आहे.



