मंत्रालयात मुलाखती घेऊन लाखोंची फसवणूक; नागपूरसह वर्धा-चंद्रपूरात गुन्हे दाखल

नागपूर | मंत्रालयाच्या नावाखाली तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून मुलाखती घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले असून आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे, तर सहा आरोपी अद्याप फरार आहेत.
नागपूरचे राहुल तायडे हे नोकरीच्या शोधात असताना त्यांचा मित्राबरोबर लॉरेन्स हेनरी घरी आला. त्याने मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी तायडे यांची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून मंत्रालयात ‘शिल्पा उदापुरे’ नावाची पाटी लावलेल्या कक्षात मुलाखत घेण्यात आली. यानंतर तायडे यांच्याकडून 9 लाख 55 हजार रुपये घेतले गेले.
2019 मध्ये पैसे घेऊनही नियुक्ती पत्र न दिल्याने तायडे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत लॉरेन्स हेनरीला अटक केली. मात्र शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उदापूरे, विजय पाटणकर, नितीन साठे, सचिन डाळस आणि बाबर नावाचा शिपाई असे सहा आरोपी अजून फरार आहेत.
या प्रकरणात मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांचे या फसवणुकीशी धागेदोरे आहेत का, याचीही पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.




