मध्यप्रदेशातील 36 मजुरांची एजंटच्या तावडीतून सुटका, पोलीस आयुक्तानी हाणून पाडला तस्करीचा प्रयत्न

नागपूर :नागपूर पोलिसांनी केलेल्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईतून मानव तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. कामाच्या आमिषाने मध्यप्रदेशातील 36 मजुरांना नागपुरात आणण्यात आले होते. मात्र पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हाणून पडलेल्या कारवाईत सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले.
या सुटकेमध्ये 23 महिला, 5 प्रौढ पुरुष तसेच 9 अल्पवयीन मुले-मुलींचा समावेश आहे. एजंटने या मजुरांना बाहेरगावी काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना तस्करीच्या जाळ्यात अडकवले जाणार होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांना यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. एजंटच्या तावडीतून मजुरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मानव तस्करीविरोधात पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद मानली जात आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, या जाळ्यात आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेक निरपराध कामगारांचे जीवन वाचले असून, अशा तस्करीविरोधी प्रयत्नांमुळे कामगारांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.


