नागपूरात दही बाजारात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 4,432 किलो निकृष्ट दही जप्त, 1.77 लाखांचा माल जप्त करून नष्ट करण्याचा निर्णय

नागपूर : शहरात नकली पनीरप्रमाणे आता नकली दहीही बाजारात विक्रीस येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food Department) आज तडके दही बाजारात छापा टाकून मोठी कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे सकाळी सहा वाजता अन्न विभागाची टीम दही बाजारात दाखल झाली. सुमारे आठ ते सव्वाआठ या वेळेत बाजारात आलेल्या एका वाहनाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हे वाहन जबलपूर येथील राजकुमार गुलशन केसरवानी डेअरीचे असल्याचे समोर आले. माहितीप्रमाणे, या डेअरीमधून नियमितपणे तीन व्यक्तींमार्फत दही पाठवले जात असे व नागपूरच्या दही बाजारातून त्याचे वितरण करून विक्री होत असे.
कारवाईदरम्यान 277 डब्यांमध्ये भरलेले एकूण 4,432 किलो दही जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे अनेक डब्यांवर जंग लागलेली होती तसेच स्टोरेज कंडिशनचे अजिबात पालन करण्यात आले नव्हते. तपासणीअंती या दह्याची किंमत जवळपास 1 लाख 77 हजार रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
अन्न विभागाने दह्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून संपूर्ण माल डंपिंग यार्डमध्ये नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.



