नागपुरात व्यापाऱ्यावर गोळीबार, ४ ते ५ लाख रुपयांची लूट करून आरोपी फरार

नागपूर | शहरातील जरिपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार करून मोठी लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू दीपानी असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांच्या पाठीवर आणि पायावर गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू दीपानी आपल्या व्यवहाराचे पैसे घेऊन जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी त्यांना गोळी झाडली आणि अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांची रोकड लुटून पसार झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जरिपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. शहरात व्यापाऱ्यावर झालेल्या या भीषण लूटकांडामुळे व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, लवकरच आरोपींना पकडले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.




