“ओबीसी बैठकीचा मला कुठलाही निरोप नाही, तरीही ओबीसीच्या हक्कासाठी लढत राहू” – बबनराव तायवाडे

नागपूर : – ओबीसी समाजाच्या हितासाठी बोलणारे नेते बबनराव तायवाडे यांनी आजच्या ओबीसी बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आज होणाऱ्या बैठकीबाबत मला कोणताही निरोप देण्यात आलेला नाही. त्यामुळे मी बैठकीत उपस्थित राहू शकत नाही. त्या बैठकीत कोणते विषय चर्चिले जाणार आहेत याची माहितीही मला नाही.”
तायवाडे पुढे म्हणाले, “ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हितरक्षणासाठी अनेक नेते असायला हवेत. एखादे आंदोलन काढायचे असेल तर त्यामागची भूमिका स्पष्ट असणे आवश्यक आहे. मोर्चा कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या मागण्यांसाठी निघतो हे पारदर्शकपणे सांगितले गेले पाहिजे. आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आणि अभ्यास करून सहमत असू, तरच अशा आंदोलनात सहभागी होऊ.”
सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक निर्णय घेतल्याचे सांगत तायवाडे यांनी भर दिला की, “आम्ही सतत ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी लढत आलो आहोत. त्याचा परिणाम म्हणून सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांच्या कल्याणासाठी तब्बल 58 जीआर काढले आहेत. मी मांडलेल्या सर्व मागण्यांवर उपसमितीत चर्चा झाली असून, त्या मागण्या योग्य ठरल्या आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की या मागण्यांना लवकरच मान्यता मिळेल.”



