पाच लाख रुपयांचे गुलाब जामुन, रसगुल्ला, बर्फी जप्त; दही नष्ट, अन्न व औषध प्रशासन विभागाने केली कारवाई

नागपूर : अन्न व औषध विभागाने बुधवार, केलेल्या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचा केमिकलयुक्त अन्नसाठा जप्त केला. ही कारवाई पारडी, पुनापूर मार्गावरील भोजराज नंदलाल लिल्हारे याच्या जी. एस, स्वीट्स आणि नमकीन या प्रतिष्ठानांवर करण्यात आली.
कारवाईदरम्यान प्रतिष्ठानात घाणेरड्या जागेत रसगुल्ले, गुलाबजामुन, बर्फी आणि दही साठवून ठेवल्याचे आढळून आले. जप्तीनंतर निकृष्ट दर्जाचे जवळपास २ लाख रुपये किमतीचे दही नष्ट केले, तर अन्नसाठ्याचे नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. जवळपास २.५० लाख रुपये किमतीचे १,२०० किलो रसगुल्ले पांढरे केमिकल टाकून तयार
करण्यात आल्याचे आढळून आले. याशिवाय गुलाबजामुन आणि बर्फी जप्त केली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबईचे सहआयुक्त (दक्षता) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न, दक्षता) यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, अखिलेश राऊत यांनी केली. सणासुदीच्या दिवसात ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे अभय देशपांडे यांनी सांगितले.



