प्रेमजाळ्यात अडकवून बस ड्रायव्हरने अल्पवयीन विद्यार्थिनी पळवले; पोलिसांनी दिला जीव वाचवणारा दिलासा, आरोपी अटकेत

नागपूर : शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या बसचा चालकाने त्याच शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमजाळ्यात ओढून पळवून नेले. या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित रेस्क्यू केले, तर आरोपी चालकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव कुणाल गायकवाड असून त्याच्यावर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पीडित मुलगी एका खासगी शाळेत शिकत होती आणि आरोपी त्याच शाळेची बस चालवत होता. शाळा ये-जा करताना आरोपीने मुलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तीन दिवसांपूर्वी पळवून नेले.
विद्यार्थिनीच्या पालकांनी तात्काळ जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. दोन दिवस आरोपी मुलीला शहरातील विविध ठिकाणी घेऊन फिरत होता, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी पीडित मुलगी व आरोपी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे. आरोपी कुणाल गायकवाड याच्यावर पोक्सो कायदा तसेच छेडछाडीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.



