प्रेमप्रसंगातून युवकाची चाकूने निर्घृण हत्या; सावनेर गुजरीखेडी झोपडपट्टी हादरली

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात शुक्रवार (19 सप्टेंबर) रात्री उशिरा एक थरारक घटना घडली. गुजरीखेडी झोपडपट्टी भागात प्रेमप्रसंगातून करणसिंह या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 9.15 वाजता करणसिंह आपल्या महिला मैत्रिणीसोबत सावनेर–नागपूर रस्त्यावर सिद्धी नाग मंदिराजवळ आला होता. याच दरम्यान, 5 ते 6 तरुणांनी दोघांनाही अडवले. यापैकी एका आरोपीने थेट करणसिंहच्या पोटात चाकू खुपसला. काही क्षणातच करणसिंह रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान, आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
सावनेर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी धावले. गंभीर जखमी अवस्थेत करणसिंहला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी जलद कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये रामेश्वर प्रथम (30, क्लिनर) व रामेशराव मालगवाम (ड्रायव्हर) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मृतक व त्याच्या महिला मैत्रिणीचे परिचित असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक चौकशीत या घटनेमागे प्रेमत्रिकोणाची पार्श्वभूमी असल्याचे समजते. सावनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींची सखोल चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारलेली नाही.



