रामटेकमध्ये भीषण अपघात : १४ वर्षीय किशोराचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी

नागपूर : रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिमटोला परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतकाचे नाव नूपुर प्रशांत वानखेडे (१४) असे असून, तो आपल्या मित्रासोबत गौरव नीलेश बेहाडे (२०) मोटारसायकलवरून मनसरहून रामटेककडे येत होता. जिमटोला परिसरात वेगामुळे मोटारसायकलवरील ताबा सुटून ती थेट रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली.
अपघात एवढा भीषण होता की नूपुर वानखेडे याचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव बेहाडे गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.



