शाळेत गेलेला मुलगा परतलाच नाही; दोन दिवसांनी झुडपांत आढळला 11 वर्षीय विद्यार्थी मृत

नागपूर : खापरखेड़ा पोलिस ठाणे हद्दीत एका 11 वर्षीय स्कूली विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत झाडीत आढळून आला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह बुधवारी सकाळी घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील वालू लेआउट परिसरातील झुडपांत सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
मृतकाची ओळख जीतू युवराज सोनेकर (वय 11) अशी झाली आहे. तो शंकरराव चव्हाण शाळेत सहाव्या इयत्तेत शिकत होता. तो आपल्या आई व आजी-आजोबांसोबत राहायचा, तर वडील व मोठा भाऊ वेगळे राहत होते. कुटुंबीयांच्या मतभेदामुळे दोन्ही भावंडे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आली आहे
१५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जीतू शाळेत जाण्यासाठी घरून बाहेर पडला होता. मात्र संध्याकाळपर्यंत तो परत न आल्याने आईने शोधाशोध केली. नातेवाईकांसह परिसरात शोध घेतला, पण काहीच माहिती मिळाली नाही. शेवटी त्याच दिवशी सायंकाळी खापरखेड़ा पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली.
बुधवारी सकाळी न्यू चनकापूर परिसरात फिरायला गेलेल्या एका नागरिकाच्या कुत्र्याने झुडुपांकडे ओढ घेतली. त्याठिकाणी पाहिले असता एका मुलाचा मृतदेह आढळून आला. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी खापरखेड़ा पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला.
शवावर डोळ्याभोवती रक्ताचे डाग आढळले असून मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह ज्या ठिकाणी सापडला ते ठिकाण त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटरवर आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा मृत्यू झाला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेला गांभीर्याने घेऊन खापरखेड़ा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. परिसरातील रहिवाश्यांकडून चौकशी केली जात आहे. पोलिसांना पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल, असे सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे खापरखेड़ा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




