सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेतील लाखो रुपयांची फसवणूक; ११७ खातेदारांचे आमरण उपोषण सुरू, News18 लोकमत चे प्रतिनिधी संजय शेंडेला अटक करण्याची मागणी
संचालक मंडळ व एजंट यांच्यावर एम.पी.आय.डी. कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी

अमरावती – शहरातील सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेच्या ११७ खातेदारांची लाखो रुपयांची ठेव संचालक मंडळ अध्यक्ष संजय शेंडे व एजंट यांनी संगनमत करून गहाळ केल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे. या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस विभाग व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला वारंवार निवेदनं देऊनही काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर खातेदारांनी ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.खातेदारांचे म्हणणे आहे की, त्यांनी मजुरी, धुणी-भांडी, भाजी विक्री यांसारख्या छोट्या-मोठ्या व्यवसायातून मेहनतीने पैसे साठवून पतसंस्थेत ठेवले. मात्र संचालक मंडळ व एजंटांनी संगनमत करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात संबंधितांनी बनावट पासबुक तयार करून खातेदारांना फसवल्याचे तसेच ठेव रकमेवरून खरेदी केलेले फ्लॅट, मालमत्ता व इतर गुंतवणुकी बाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.याशिवाय संचालक मंडळावर आयकर, जीएसटी चोरीचे आरोपही करण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून चार महिन्यांपासून ऑडीट न केल्याबद्दल त्यांच्यावरही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संचालक मंडळ व एजंटांनी खातेदारांच्या ठेव रकमा व्यापाऱ्यांना दिल्याचा व त्याचे व्याज स्वतःकडे ठेवण्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.खातेदारांनी स्पष्ट केले की, शासनाने तातडीने एम.पी.आय.डी. कायद्याअंतर्गत संचालक मंडळ व एजंटांवर गुन्हे दाखल करून सर्व ठेव व्याजासकट परत करावी. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा राजेश वानखडे भीम ब्रिगेड संघटना यांनी दिला आहे.

