टाटा संस चेयरमॅन एन. चंद्रशेखरन यांची नागपुरातील सोलर इंडस्ट्रीजच्या संरक्षण संयंत्राला भेट

नागपूर : – टाटा संसचे चेयरमॅन एन. चंद्रशेखरन यांनी आज नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीजच्या संरक्षण (डिफेन्स) संयंत्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सोलर कंपनीत तयार होणाऱ्या गोळाबारूद, क्षेपणास्त्रे आणि इतर महत्त्वपूर्ण संरक्षण साहित्याच्या उत्पादनाची पाहणी केली.
माध्यमांशी संवाद साधताना एन. चंद्रशेखरन म्हणाले, “संरक्षण हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक खेळाडूंची आवश्यकता आहे. भारताच्या संरक्षण गरजा कुणी दुसरा भागवू शकत नाही, म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. सहकार्य जिथे शक्य असेल तिथे आम्ही सहकार्य करू. आजचा दौरा हा केवळ संयंत्र पाहण्यासाठी आणि तेथे नेमके काय काम चालते हे जाणून घेण्यासाठी होता. संरक्षण क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर संधी आणि क्षमता निर्माण होतील.”
दरम्यान, सोलर इंडस्ट्रीजचे चेयरमॅन सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले की, “या भेटीमागे कोणताही ठराविक अजेंडा नव्हता. दोन दिवसांपूर्वीच आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली की श्री. चंद्रशेखरन भेट देऊ इच्छितात. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रात भविष्यात प्रचंड संधी आहेत.”
चंद्रशेखरन यांच्या या भेटीमुळे नागपूरातील सोलर इंडस्ट्रीजच्या संरक्षण क्षमतेबद्दल नव्याने चर्चा रंगली आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


