उपमुख्यमंत्री अजित पवारांना नागपूरात मोठा धक्का; जिल्हाध्यक्ष बाबा गुजरांचा राजीनामा, ‘आरोग्य आणि नव्या पिढीला संधी’ देण्याचं कारण पुढे

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना बाबा गुजर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी आणि नव्या पिढीला काम करण्याची संधी मिळावी, या कारणांमुळे मी पदाचा राजीनामा देत आहे.”
गुजर यांनी आपला अधिकृत राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला असून, पुढील कार्यवाही पक्ष हाती घेणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
नागपूरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अजित पवार गटाने तयारीला वेग दिला होता. अशातच जिल्हाध्यक्षांचा राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनाम्यानंतर स्थानिक पातळीवर नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार, तसेच कार्यकर्त्यांचे संघटन कसे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




