“‘वंदे मातरम पार्क’ कामात विलंब; आयुक्त चौधरींची ठेकेदारांना कडक समज”
"शहीद सैनिकांच्या स्मृतीसाठी उभारला जाणारा वंदे मातरम पार्क लवकर पूर्ण करा – आयुक्तांचे निर्देश"

नागपूर : एम्प्रेस मिल परिसरात शहीद व वीरता पदक विजेत्या सैनिकांच्या स्मृतीसाठी उभारला जाणारा ‘वंदे मातरम पार्क’ लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी दिले. त्यांनी ठिकाणी पाहणी करून कामातील झालेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली तसेच ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले.
सुमारे एक लाख चौ. फूट क्षेत्रावर हे अद्वितीय स्मृती उद्यान उभारले जात आहे. यात युद्धात शहीद झालेले सैनिक, वीरता पदक प्राप्त सैनिक, माजी सैनिक तसेच युद्धात शौर्य गाजवलेल्या सैनिकांच्या वीरांगना व त्यांच्या आश्रितांना अभिवादन केले जाणार आहे.
आयुक्त चौधरी यांनी स्पष्ट केले की, हे उद्यान शहरासाठी गौरवाचे प्रतीक ठरणार असून, कामात झालेल्या कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांनी अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळमर्यादा पाळण्याचे निर्देश दिले.
या उद्यानात नागरिकांसाठी लाइट अँड साउंड शोची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच परिसरात असलेल्या ऐतिहासिक एम्प्रेस मिलच्या चिमणीचे मजबुतीकरण आणि आकर्षक प्रकाशयोजना करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात माजी महापौर दयाशंकर तिवारी हे देखील उपस्थित होते.



