विदर्भ एक्सप्रेसमध्ये युवतीशी छेडछाड; लोहमार्ग पोलिसांची जलद कारवाई, २४ तासांत आरोपीला अटक

नागपूर : गोंदिया–नागपूर मार्गावर धावणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये एका युवतीशी छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे लोहमार्ग पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत आरोपीला गजाआड केले आहे. या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटना २१ सप्टेंबरच्या संध्याकाळची आहे. पीडित युवती ट्रेन क्रमांक १२१०६ विदर्भ एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होती. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गाडी नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर थांबली असता, उतरतानाच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने युवतीशी छेडछाड केली आणि लगेच पसार झाला.
घटनेनंतर घाबरलेल्या युवतीने तत्काळ नागपूर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त माहितीदारांचा आधार घेत संशयिताचा शोध सुरू केला.
पोलिसांच्या कसून तपासानंतर गोंदिया येथील जितेंद्र विजय लारोकर असे आरोपीचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली असून प्रवाशांमध्ये पोलिसांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.



