येरखेड्यात 6 वर्षीय चिमुकली क्रिस्टीना मरकामचा मृतदेह नाल्यात सापडल्याने खळबळ

येरखेडा (नागपूर) | येरखेडा गावातील प्रीती सोसायटी येथे राहणाऱ्या 6 वर्षीय क्रिस्टीना मरकाम या बालिकेचा मृतदेह गावाजवळच्या बागडोरा नाल्यात सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून क्रिस्टीना बेपत्ता झाली होती. तिची आई मनीषा मरकाम यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली, मात्र दुसऱ्या दिवशीपर्यंत मुलीचा काहीच सुगावा लागला नाही.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता ती मुलगी नाल्याच्या दिशेने जाताना दिसली. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहायक पोलीस उपायुक्त अंकुश खेडेकर, पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि त्यांच्या टीमने नाल्याजवळ शोधमोहीम सुरू केली. अखेर शनिवारी सायंकाळी क्रिस्टीना हिचा मृतदेह नाल्यात सापडला.
या घटनेमुळे येरखेडा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



