11,000 कोटींचा कर्ज घोटाळा; उद्योगपती मनोज जायस्वाल सीबीआयच्या जाळ्यात

नागपूर – कोळसा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेले उद्योगपती मनोज जायस्वाल यांना 11,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. सध्या जायस्वाल यांची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे.
निरव मोदी आणि विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या कर्जाएवढाच मनोज जायस्वाल यांचा घोटाळा असल्याचा आरोप आहे. विविध बँकांकडून घेतलेल्या 11,000 कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज हे या रकमेपेक्षाही जास्त आहे.
2017 मध्ये मनोज जायस्वाल यांना सीबीआयने अटक केली होती आणि या प्रकरणात ते जामिनावर होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपला व्यवसाय आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हलवला होता.
सुमारे दहा वर्षांपूर्वी मनोज जायस्वाल यांनी बॉम्बार्डियर नावाचे एक विमान खरेदी केले होते. महाराष्ट्रात एवढे मोठे विमान घेणारे ते मोजकेच उद्योगपती होते. हे विमानही कर्जाच्या पैशांतून घेतल्याचा आरोप आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे विमान नागपूर विमानतळावर धूळ खात पडले आहे. अनेक कर्जदार बँकांनी हे विमान विकून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.
यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात तत्कालीन कोळसामंत्री श्रीप्रकाश जायस्वाल आणि मनोज जायस्वाल यांनी देशभरातील अनेक कोळसा खाणी अनुभव नसलेल्या उद्योगांना वितरित करण्यासाठी दलाली घेतल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ईडी आणि सीबीआयने त्यांच्या विरोधात केसेस दाखल केल्या आहेत.


