आशीनगर झोनमध्ये सफाईत ढिलाई; सहाय्यक आयुक्तांसह निरीक्षक व जमादारांना कारणे दाखवा नोटीस

नागपूर:महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी गुरुवारी आशीनगर झोनअंतर्गत विविध उपस्थिती केंद्रांची पाहणी केली असता सफाई कामकाजात मोठी ढिलाई आढळून आली. या पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची धडक पावले उचलण्यात आली आहे.
निरीक्षणादरम्यान अनेक सफाई कर्मचारी अनुपस्थित आढळले, तसेच काही निरीक्षक व जमादार आपले कार्य नीट पार पाडत नसल्याचेही लक्षात आले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी आशीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त, झोनल अधिकारी, सफाई निरीक्षक प्रफुल्ल रंगारी तसेच सफाई जमादार अनूप रंगारी व मनोज माळिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वार्ड क्र. 2 मधील उपस्थिती केंद्रावर सहाय्यक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात तब्बल 30 सफाई कर्मचारी अनुपस्थित, तर जमादार अनूप समुद्रे यांच्या हद्दीत 26 कर्मचारी अनुपस्थित, तसेच मनोज माळिक यांच्या क्षेत्रात 4 कर्मचारी विनासूचना अनुपस्थित असल्याचे आढळले.
या निष्कर्षानंतर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी उपायुक्त राजेश भगत यांना संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त भगत यांनी कार्यातील निष्काळजीपणाबद्दल सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 24 तासांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.




