डब्ल्यूसीएलच्या डिस्पेन्सरीत फसवणुकीचा पर्दाफाश; वैद्यकीय अधीक्षक व मेडीकल स्टोअर संचालकाविरुद्ध सीबीआयची कारवाई

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या सिव्हिल लाईन्स येथील डिस्पेन्सरीत झालेल्या प्रचंड फसवणुकीचा पर्दाफाश सीबीआयच्या नागपूर युनिटने केला आहे. या प्रकरणात डब्ल्यूसीएलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पृथ्वी कृष्ण पट्टा आणि ‘सद्गुरु मेडिकल स्टोअर्स’चे संचालक कमलेश लालवानी या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ सप्टेंबर रोजी सीबीआयकडे तक्रार दाखल झाली होती की, डॉ. पट्टा यांनी तयार केलेल्या बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सद्गुरु मेडिकल स्टोअर्सने जास्तीच्या दराचे बिल सादर करून डब्ल्यूसीएलकडून रक्कम वसूल केली.
या तक्रारीनंतर सीबीआयने डब्ल्यूसीएलच्या सतर्कता विभागासह संयुक्त चौकशी केली. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की, मूळ प्रिस्क्रिप्शनमध्ये नंतर महागड्या औषधांची नोंद करण्यात आली होती, तर डिस्पेन्सरीत ठेवलेल्या कार्बन प्रतींमध्ये त्या औषधांचा उल्लेखच नव्हता. इतकेच नव्हे तर अनेक रुग्णांनीही सांगितले की त्यांनी ती औषधे कधी घेतलीच नव्हती.
डॉ. पट्टा यांनी कमलेश लालवानी यांच्या मदतीने मूळ पर्च्यांमध्ये फेरफार करून सुमारे १.५५ लाख रुपयांचे वाढीव बिल तयार केल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुकीत सद्गुरु मेडिकल स्टोअर्सला अनुचित लाभ मिळाला.
सीबीआयने या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचारी किंवा अधिकारीही या गैरव्यवहारात सामील होते का, याचा तपास सुरू आहे.
