जरीपटका येथे घरफोडीची मोठी घटना; १९ लाखांच्या मालावर चोरट्यांचा हात साफ, घटना सीसीटीव्हीत कैद

नागपूर: शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदर्श कॉलनी परिसरात मोठ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने एका घराला लक्ष्य करत सुमारे १९ लाख रुपयांच्या मालावर हात साफ केला. या प्रकरणातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यावरून चोरट्याचा शोध सुरू आहे.
ही घटना २ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ३ ऑक्टोबर दरम्यान घडली. फिर्यादी रोहिणी यादव यांनी आपल्या कुटुंबासह २ ऑक्टोबर रोजी भीम चौक येथे मोठ्या पप्पांच्या गृहप्रवेश सोहळ्यासाठी घराला कुलूप लावून प्रस्थान केले होते. रात्री त्या कुटुंबासह तिथेच थांबल्या होत्या.
मात्र, ३ ऑक्टोबर रोजी परत घरी आल्यावर त्यांनी घराचे दार उघडे असल्याचे पाहिले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने सोन्या–चांदीचे दागिने व रोकड असा मिळून तब्बल १९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. केवळ दागिन्यांची किंमत साडेसात लाख रुपये इतकी असल्याचे समजते.
तपासादरम्यान पोलिसांना घरात शिरताना व बाहेर येताना एक संशयित चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली असून, परिसरात तपासाचा धडाका सुरू आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.




