महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा होता?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार अंतिम टप्प्यात असताना हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. पण या कथित हल्ल्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे.

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. नागूपर ग्रामीण पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात संबंधित घटना खोटी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट पाठवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुरावेच शोधले नाहीत तर फॉरेन्सिक तपास देखील केला होता. पण पोलिसांना या प्रकरणात कोणतेही तथ्य आढळले नाहीत. त्यामुळे या घटनेबाबत कोणताही तपास होऊ शकत नाही. ही घटना फर्जी होती असा आशयाचा रिपोर्ट पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 19 नोव्हेंबर 2024 ला हल्ला झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी त्यावेळी सुरु होती. प्रचार अंतिम टप्प्यावर असताना अनिल देशमुख यांच्यावर हल्ल्याची घटना घडली होती. अनिल देशमुख मुलाच्या प्रचारासाठी गेले होते. या दरम्यान नरखेडवरुन काटोलच्या दिशेला परतताना बैलफाटा येथे अंधारात लपलेल्या चार लोकांनी अचानक गाडीसमोर येऊन दगडफेक केली, असा आरोप करण्यात आला होता.

या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. या घटनेनंतर त्यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यावेळी प्रचंड राजकीय वातावरण तापलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी रात्री उशिरापर्यंत आंदोलन केलं होतं.

मोठं राजकीय वादळ या घटनेनंतर निर्माण झालं होतं. पण पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात या घटनेत कोणतही तथ्य आढळलेलं नाही. त्यामुळे ही घटना खरंच घडली होती की राजकीय सहानुभूती निर्माण करण्यासाठी ती घटना घडवण्यात आली होती? असा प्रश्न पोलिसांच्या बी फायनल रिपोर्टनंतर उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेवर आता अनिल देशमुख काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button