नागपूरमधील गुलशन प्लाझा हॉटेलच्या मालकाचा पत्नीसह मृत्यू, इटलीत भीषण अपघात, मुलगी गंभीर जखमी
नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर यांचा आणि त्यांच्या पत्नीचा इटलीमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमधील भारतीय दूतावासाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. इटलीमधील (Italy) ग्रोसेटो शहरात हा अपघात (Road Accident) झाला.
या अपघातामध्ये नागपूरच्या अख्तर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची एक मुलगी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय दूतावासातील अधिकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून जावेद अख्तर यांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला असून आता मुलीला वाचवण्यासाठी भारतीय दूतावासाकडून शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
जावेद अख्तर हे नागपूरमधील गुलशन प्लाझा हॉटेलचे मालक होते. ते त्यांची पत्नी नद्र अख्तर आणि 24 वर्षांच्या मुलीसोबत इटलीमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी ग्रोसेटो शहरात त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची बातमी नागपूरमध्ये धडकताच शहरवासियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


