नागपुरात ‘आपली बस’ सेवेचा नवा इतिहास – एका दिवसात तब्बल १.८२ लाख प्रवासी प्रवास करून गाठला विक्रम!

नागपुर : नागपूर महानगरपालिकेच्या “आपली बस” सेवेवर नागरिकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. या विश्वासाचेच प्रतीक म्हणजे — सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी ‘आपली बस’ने एका दिवसात तब्बल १,८२,१४८ प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले. ही आकडेवारी या सेवेच्या इतिहासातील सर्वाधिक असून, सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात हा एक नवा विक्रम ठरला आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी या उल्लेखनीय कामगिरीसाठी नगर परिवहन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले की, “आपली बस” ही सेवा नागपूरकरांसाठी विश्वास, सुरक्षितता आणि सोयीचे प्रतिक बनली आहे.
डिजिटल नागपूरकडे वाटचाल
महानगरपालिका प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर, बस प्रवासादरम्यान डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे, जे “डिजिटल नागपूर” या संकल्पनेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.
विद्यार्थ्यांसाठी पास अभियान
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, यासाठी ‘आपली बस’ने अलीकडेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पास अभियान राबवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अधिक किफायतशीर आणि सुलभ बनली असून, पर्यावरणपूरक प्रवासालाही चालना मिळत आहे.
नागपूरकरांची पहिली पसंती
सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी “आपली बस” नागपूरकरांची पहिली पसंती बनली आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासीसंख्या गाठून ‘आपली बस’ने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
“आपली बस” — नागपूरचा अभिमान, नागरिकांचा विश्वास!



