“नागपुरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास अठावले यांचा मोठा प्रस्ताव : आत्मसमर्पित नक्षली भूपतीला RPI मध्ये येण्याचे आमंत्रण”

नागपूर – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अठावले यांनी नागपूर दौऱ्यात आज एक महत्त्वपूर्ण विधान केलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षली नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती (Mallojula Venugopal alias Bhupathi) याला त्यांनी थेट त्यांच्या पक्षात सामील होण्याचं आमंत्रण दिलं आहे.
अठावले म्हणाले की, “भूपतीसारखे सर्व नक्षलवादी आता शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात यावेत. हिंसेतून काहीही साध्य होत नाही. लोकशाहीत बदल घडवायचा असेल तर राजकारणाच्या माध्यमातून करा.”
केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले, “जर भूपतीला समाजाच्या भल्यासाठी काम करायचं असेल, तर त्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) मध्ये सामील व्हावं. आम्ही अशा सर्वांना संधी देऊ इच्छितो जे हिंसा सोडून समाजाच्या विकासासाठी काम करू इच्छितात.”
अठावले यांनी यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं. त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात नक्षलवाद कमी करण्यासाठी केलेली पावले प्रशंसनीय आहेत. पोलिस दल आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे अनेक नक्षली आत्मसमर्पण करत आहेत, हे राज्यासाठी सकारात्मक संकेत आहेत.”
नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अठावले यांनी स्पष्ट केलं की, “नक्षलवादाने अनेक जीव गेले, पण आता समाजाला शांती आणि विकासाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नक्षलीने मुख्य प्रवाहात येऊन राष्ट्रनिर्माणात सहभागी व्हावं.”
या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, भूपती यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



