ओबीसी समाजाचा नागपुरात महामोर्चा; वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल – “लाडका गुन्हेगार योजना सुरू करा!”

नागपूर – राज्यातील ओबीसी आरक्षण प्रश्नावरून असंतोष व्यक्त करण्यासाठी ओबीसी समाज शुक्रवार, नागपूरात महामोर्चा काढणार आहे. राज्य सरकारने जारी केलेला जीआर रद्द न केल्याने संतप्त झालेल्या ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरायचे ठरवले आहे. या मोर्चामध्ये ओबीसी समाजासोबत विविध राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरात मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले, “ही सरकार ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. आरक्षणाचा प्रश्न न सोडवता समाजाला दिशाभूल केली जात आहे.”
त्यांनी पुढे सरकारवर टीका करताना म्हटले की, “गुन्हेगारांना शस्त्र परवाने देणारे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना मंत्री बनवावे. इतकेच नव्हे तर सरकारने आता ‘लाडका गुन्हेगार योजना’ सुरू करावी, ज्यातून गुन्हेगारांना आर्थिक मदत मिळेल.”
तसेच अकोला जिल्ह्यातील एका ओबीसी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेवर दुःख व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले, “युवकांनी आपल्या हक्कांसाठी लढा द्या, पण स्वतःच्या जीवावर बेतणारे पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्यासाठी लढतोय, त्यामुळे धीर धरा.”
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या या महामोर्च्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे.




