पारडीमध्ये कारखाली दबून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

नागपूर : – पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत चार वर्षीय कान्हा राहुल देशमुख या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कान्हा सोनबाजी नगर, भंडारा मार्ग येथील घरासमोरील रेतीवर खेळत होता. त्याचवेळी परिसरातील नीलेश ज्ञानेश्वर सतीबावणे (३५) हा कार (एमएच ४३ एडब्लू १२५६) घेऊन आला व घराशेजारी पार्किंग करण्याच्या घाईत होता. मागे कोणी आहे याकडे दुर्लक्ष केल्याने कार थेट कान्हाच्या अंगावरून गेली.
कान्हाच्या किंकाळ्यांनी स्थानिकांनी धाव घेत मुलाला तत्काळ पारडीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुलाचे काका विशाल देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



