पारडीतील ‘हॉटेल शेरे पंजाब’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; संचालिका अटकेत, क्राईम ब्रांचच्या कारवाईने खळबळ

नागपूर : पारडी परिसरातील भंडारा रोडवर असलेल्या हॉटेल शेरे पंजाब येथे शुक्रवारी संध्याकाळी क्राईम ब्रांचच्या युनिट-५ च्या पथकाने छापा टाकत देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत हॉटेलची संचालिका अटकेत घेतली असून, एक महिलेला पीडित म्हणून सोडविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलच्या तळमजल्यावर बार आणि वर लॉजची व्यवस्था आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की या हॉटेलमध्ये देहव्यापाराचा धंदा सुरू असून, ग्राहकांना महिलांची सप्लाय आणि राहण्यासाठी खोली उपलब्ध करून दिली जाते. माहितीच्या आधारे पोलिसांनी एक पंटर हॉटेलमध्ये पाठवला. त्याने ठरलेला इशारा दिल्यानंतर संध्याकाळी सुमारे पाच वाजता पोलिसांनी अचानक छापा टाकला.
या छाप्यात बार आणि लॉजच्या खोल्यांची झडती घेतली असता, एका महिलेला संशयास्पद अवस्थेत आढळून आले. तिला पीडित म्हणून मुक्त करण्यात आले.
कारवाईत हॉटेल संचालिका मंजीत कौर अजितसिंह भाटिया (वय ६०, रा. देशपांडे ले-आऊट) हिला अटक करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला पूर्वीपासून होती, मात्र कारवाई टाळण्यात येत होती. क्राईम ब्रांचच्या या धडक कारवाईनंतर पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




