प्रेमप्रसंगाच्या गुंत्यातून ‘बीएससी अॅग्री’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या; लग्न व मुलगा असल्याची बाब झाली उघड

नागपूर : – बजाज नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतकाची ओळख राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील ईश्वरलाल चौधरी (वय अंदाजे 24 वर्षे) अशी झाली आहे. तो बी.एस्सी. अॅग्रीकल्चरच्या अंतिम वर्षात शिकत होता व महाविद्यालयाच्या बॉयज हॉस्टेलमध्ये राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरलाल चौधरीने वसतिगृहातील खोली क्रमांक 11 मध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. सकाळी त्याचे सहाध्यायी दरवाजा ठोठावत होते, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता ईश्वरलाल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तात्काळ बजाज नगर पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. तपासादरम्यान खोलीतून एक सुसाईड नोटही मिळाली. त्यामध्ये ईश्वरलाल एका तरुणीसोबत प्रेमसंबंधात असल्याचे नमूद आहे. परंतु चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली की, ईश्वरलाल आधीच विवाहित होता आणि त्याला दीड वर्षांचा मुलगाही आहे. ही गोष्ट त्याने संबंधित तरुणीपासून लपवली होती.
दरम्यान, तरुणीच्या विवाहाच्या आग्रहामुळे व नात्यातील गुंतागुंतीमुळे ईश्वरलालने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे कृषी महाविद्यालय परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातील गुंतागुंतीचे आणखी एक बळी गेल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

