पवनी बफर झोनमध्ये दोन वाघांचे मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पवनी बफर झोन परिसरात दोन वाघ मुक्तपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाघांच्या या हालचालीमुळे पवनी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
वनविभागाच्या पवनी बफर झोन कार्यालय परिसरात सागवानाच्या लाकडांचा साठा करण्यात आला आहे. याच परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साधारणपणे ५ ते ६ वाजताच्या सुमारास वाघ मुक्तपणे फिरताना नागरिकांच्या नजरेस पडला. एवढेच नव्हे तर रात्री ८ वाजताच्या सुमारास पवनी–हिवरा बाजार रोडवरही वाघ उघड्यावर रस्त्यावरून फिरताना पाहिला गेला.
या भागात दोन्ही वाघांचा मुक्त संचार होत असल्याने गावाच्या घनदाट वस्तीच्या जवळच ते फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या भागात दक्षता घ्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.


