संतरागाछी-नांदेड़ सुपरफास्ट एक्सप्रेसला बॉम्बने उडविण्याची धमकी; मानसिक रुग्णाने पसरवली खोटी अफवा!

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी एक अफरातफर माजली, जेव्हा संतरागाछी-नांदेड़ सुपरफास्ट एक्सप्रेस उडविण्याची धमकी मिळाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपी आणि बॉम्ब स्क्वॉडची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण गाडीची कसून तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही आणि गाडीला सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीने ही खोटी अफवा पसरवली होती. तो आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत मजूर म्हणून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने तीन वेळा चेन पुलिंग केली तसेच पँट्री कारच्या कर्मचाऱ्याशी वाद घातला. त्याच दरम्यान त्याने धमकी दिली की “ट्रेनमध्ये त्याचे इतर साथीदार आहेत आणि ते बमने ट्रेन उडवणार आहेत.”
धमकीची माहिती मिळताच एस्कॉर्टिंग टीमने तत्परतेने कारवाई करत त्या व्यक्तीस पकडले आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना गोंदिया स्थानकावर उतरवून ताब्यात घेतले. दरम्यान, नागपूर रेल्वे स्थानकावरही सतर्कता वाढविण्यात आली होती. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर पोहोचताच बॉम्ब स्क्वॉडने संपूर्ण गाडीची तपासणी केली. तपासात काहीही संशयास्पद न आढळल्याने ट्रेन पुन्हा रवाना करण्यात आली.
नंतरच्या चौकशीत समोर आले की धमकी देणारा व्यक्ती मानसिकरित्या आजारी आहे. त्याच्या या कृतीमुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन दोघेही काही काळ चिंतेत सापडले.



