सिंबायसिस कॉलेजच्या समोर जुन्या वादातून विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; दगडाने मारून केल गंभीर जखमी, तीन आरोपी फरार
सिंबायसिस कॉलेज परिसर गुन्हेगाराचा अखाड़ा

नागपूर : वाठोड़ा पोलीस ठाणे हद्दीत जुन्या वादातून एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सिंबायसिस कॉलेजच्या समोर घडली असून, संपूर्ण प्रकार कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्याचे नाव अमन आमेसर (१८) असून तो छाप्रू नगर येथील रहिवासी आहे. अमनचा आरोपी ध्रुव अग्रवाल या युवकासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. ७ ऑक्टोबरच्या दुपारी अमन ‘चॅलेंज कॅफे’ येथे स्नूकर खेळण्यासाठी गेला असता, त्यावेळी तेथे ध्रुव अग्रवाल, पटया आणि प्रिन्स सज्जू हे तिघे आले.
या तिघांनी अमनवर अचानक हल्ला चढवला. प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना वाद विकोपाला गेला आणि पटयाने दगड उचलून अमनच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे अमन गंभीर जखमी झाला. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी अमनला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अमनच्या तक्रारीवरून वाठोड़ा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध मारहाण आणि जीवघेणा हल्ला करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कॉलेज परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


