वर्धमान नगरात चोरांचा धुमाकूळ! दिवसाढवळ्या बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास; सीसीटीव्हीत कैद झाले चोरट्यांचे कारनामे

नागपूर – शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी थैमान घातले आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वर्धमान नगरातील वैष्णोदेवी चौक परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलशन दिगंबर काले हे कुटुंबासह वर्धमान नगरात राहतात. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते कुटुंबासह वणी येथे नातलगांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दार फोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून चोरट्यांनी १ लाख ७ हजार रुपये रोख रक्कम आणि २३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला.
रात्री सुमारे १०.३० वाजता कुटुंब घरी परतल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ लकडगंज पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन ते चार अज्ञात चोर घरात येताना आणि चोरीनंतर बाहेर जाताना दिसले. या फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांमध्ये पोलिस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.




