कृत्रिम टाकीत बुडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू; भाजप युवा मोर्चाचा महापालिकेवर घणाघात

नागपूर शहरातील लकडगंज परिसरात गणेश विसर्जनासाठी उभारलेल्या कृत्रिम टाकीत ७ वर्षीय महेश थापा या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना काल (१० जुलै) सायंकाळी कच्छी विसा मैदानात घडली. विसर्जनासाठी महापालिकेने उभारलेल्या टाकीत भरलेल्या पाण्यात तो खेळताना बुडाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महापालिकेच्या हलगर्जीपणावर टीका होत आहे.
महेशचा मृत्यू ही निष्काळजीपणाची फलश्रुती असल्याचा आरोप करत आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने लकडगंज झोन कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान मोर्चेकऱ्यांनी महापालिकेच्या कामकाजावर रोष व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
मोर्चादरम्यान झोन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांना गेटवरच रोखण्यात आलं. तरीही आंदोलन शांततेत पार पडलं.
गेल्या वर्षी महापालिकेने कच्छी विसा मैदानात एक कोपऱ्यात गणेश विसर्जनासाठी कायमस्वरूपी कृत्रिम टाकी उभारली होती. मात्र त्या टाकीभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक नसल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.