ग्रॅंडमास्टर दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश भूषण गवईंकडून विशेष गौरव

नागपूर : – शतरंज क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ग्रॅंडमास्टर दिव्या देशमुखच्या घरी नुकतीच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी दिव्याचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. के. जी. देशमुख, दिव्याचे आजोबा, हे अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्यांच्या आणि दादासाहेब गवई यांच्यातील आत्मीय संबंधांची आठवण सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी आवर्जून केली. “देशमुख आणि आमच्या कुटुंबातील नातं केवळ औपचारिक नव्हतं, तर ते जिव्हाळ्याचं होतं,” असे त्यांनी सांगितले.
दिव्याच्या जागतिक पातळीवरील कामगिरीचा उल्लेख करत गवई म्हणाले, “तिचे यश महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या प्रेरणादायी प्रवासातून अनेक नवोदित खेळाडूंना दिशा मिळेल.”
हा क्षण देशमुख कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण नागपूर आणि महाराष्ट्रासाठी गौरवाचा ठरला.