नागपूर एम्सच्या हॉस्टेलमध्ये ११वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, शॉलने बाथरूमच्या हुकला गळफास

नागपूर – नागपूर एम्स हॉस्पिटल परिसरातील चरक हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ११वीतील वैद्यकीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संकेत पंडितराव दाभाडे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो हॉस्टेलमधील खोली क्रमांक ९०९ मध्ये राहत होता.
ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. वॉर्डन नीरल भोसले यांनी संकेतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद न मिळाल्याने मास्टर कीने खोली उघडण्यात आली. दरवाजा उघडल्यानंतर बाथरूमच्या दरवाज्याजवळ त्याचा मृतदेह शॉलने लटकलेला आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच हॉस्टेल इंचार्ज, सुरक्षा कर्मचारी व स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत संकेतने बाथरूमच्या दरवाज्याच्या हुकला शॉल बांधून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या वेळी तो निळ्या रंगाची अर्धी टी-शर्ट व काळी पँट घातलेला होता. त्याच्या हात-पायांवर काही काळसर डाग दिसून आले. बाथरूमजवळ एक लाकडी साइड टेबलही आढळून आली आहे.
पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी एम्स रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पुढील तपास सुरू आहे.