अमरावती प्रभाग २२ मध्ये अस्वच्छतेचा साम्राज्य! शिंदे गटाच आयुक्तांना निवेदन

अमरावती : – प्रभाग क्रमांक २२, बडनेरा शहरातील उकंडा भागात अस्वच्छतेची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, त्यात चरत असलेल्या गायी, साचलेला चिखल आणि दुर्गंधी यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी महानगरपालिकेच्या साफसफाई यंत्रणेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात नियमित स्वच्छता होत नाही. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भयावह होते. गायी प्लास्टिक आणि सडका अन्न खाण्यास भाग पडतात, जे त्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे.
स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना आणि स्मार्ट सिटीसारख्या योजना केवळ भिंतीवर दिसत असून प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे डोंगर उभे राहत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे.
शिंदे गटाने प्रशासनाला त्वरीत कारवाईची मागणी केली असून, सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित केला आहे.