नागपूर : मानकापूर रिंग रोडवर भीषण अपघात; दोन ट्रकच्या मधोमध कार , चालक गंभीर जखमी

नागपूर – मानकापूर रिंग रोडवर एका भीषण अपघातात एक कार दोन ट्रकच्या मध्ये चिरडली. ही दुर्घटना गुरुवारी घडली, जेव्हा सिग्नलवर थांबलेल्या कारला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कार पुढे उभ्या ट्रकवर आदळली आणि दोन्ही ट्रकच्या मध्ये चकनाचूर झाली.
घटनेत कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार सिग्नलवर थांबली होती. तेवढ्यात मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने थेट कारला उडवले. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही ट्रक जप्त केले असून प्राथमिक तपासात ओव्हरस्पीडिंग आणि बेदरकारपणे वाहन चालवणे हे कारण समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी रिंग रोडवर ट्रॅफिक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना आणि स्पीड लिमिटची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.