नागपूरात हरित क्रांतीचा वेग – मनपाकडून ११ ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारणीला सुरुवात

नागपूर : पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेला चालना देत नागपूर महानगरपालिकेने शहरात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) अंतर्गत ११ ठिकाणी आधुनिक ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम शुक्रवारी (९ ऑगस्ट) अधिकृतरीत्या सुरू झाले. रहाटे चौक येथे अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिलायन्स बीपी इन्फ्रा लिमिटेडच्या सहकार्याने उभारण्यात येणारी ही केंद्रे जयताळा, रहाटे कॉलनी, यशवंत स्टेडियम, फुटाळा रोड, वाडी नाका, शांतिनगर, अंजुमन कॉलेज परिसर आदी प्रमुख ठिकाणी उभारली जाणार आहेत.
या उपक्रमामुळे शहरातील ई-दोनचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना सहज चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार असून नागपूरला हरित, स्मार्ट आणि पर्यावरण-संवेदनशील शहर बनविण्याकडे ही एक निर्णायक झेप ठरणार आहे.