गरुड दृष्टि’ची गरुडझेप! सायबर फसवणुकीतून नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी – ७,४०५ पीडितांना तब्बल ₹१० कोटींची परतफेड

नागपूर पोलिसांनी विकसित केलेले अत्याधुनिक “गरुड दृष्टि” हे सोशल मीडिया मॉनिटरिंग साधन आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. पोलिस भवनात झालेल्या या कार्यक्रमात २०२५ मधील विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ७,४०५ पीडितांना तब्बल ₹१० कोटींची परतफेड करण्यात आली. याशिवाय, ₹१२.५ कोटींची रक्कम NCCRP पोर्टलद्वारे गोठवून ठेवलेली असून तीही लवकरच पीडितांना परत मिळणार आहे.
मुख्यमंत्री यांनी निवडक पीडितांना प्रत्यक्ष धनादेश देऊन परतफेड केली. त्यात रोहित अग्रवाल यांना सर्वाधिक ₹७३ लाख, तर इतरांना ₹१० लाखांपासून ₹३५ लाखांपर्यंतची रक्कम मिळाली.
गरुड दृष्टि’ची वैशिष्ट्ये:
आतापर्यंत ३०,००० सोशल मीडिया पोस्ट्सची तपासणी
६५० आक्षेपार्ह पोस्ट्स हटवल्या
अफवा, द्वेषपूर्ण मजकूर व वादग्रस्त पोस्ट्सवर तात्काळ कारवाई
“सायबर हॅक २०२५” मधून जन्मलेली, अत्यल्प खर्चातील स्थानिक नवकल्पना
ट्रेंड विश्लेषण, संशयास्पद खाते शोधणे आणि गुन्हे प्रतिबंधासाठी बहुपयोगी साधन
नागपूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसून, सामाजिक ऐक्य आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होत असल्याचे मुख्यमंत्री यांनी गौरवोद्गार काढले.



