नागपुरात बनावट नोकरी रॅकेटचा पर्दाफाश! ३७ लाखांची फसवणूक करणारा रोशन खोड़े गजाआड

नागपूर : – नागपूर पोलिसांनी एका मोठ्या बनावट नोकरी रॅकेटचा भंडाफोड करत रोशन खोड़े नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने स्वतःला नागपूर मेट्रो आणि आरोग्य विभागाशी संबंधित असल्याचे सांगत अनेकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बनावट ओळखपत्रे आणि खोटे नियुक्तीपत्रही तयार केले होते.
तक्रारदाराकडून आरोपीने विविध हप्त्यांमध्ये ऑनलाइन ९.७१ लाख रुपये आणि रोख ३.३० लाख रुपये, असे एकूण १३.०१ लाख रुपये घेतले. इतकेच नाही तर महेश भुजाडे यांच्याकडून १० लाख रुपये घेऊन त्यांना वर्धा आरोग्य विभागात बनावट नियुक्ती देत यवतमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १० दिवस कामही करवून घेतले. दिनेश बरवे, कविता बंद्रे, प्रीति पेदराज आणि राकेश पेदराज यांच्यासह इतर पीडितांकडूनही पैसे उकळून एकूण ३७.६२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
गुप्त माहितीनुसार पोलिसांनी पथक पाठवून आरोपीला जेरबंद केले. त्याच्यावर भारतीय दंड विधानातील कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
