नागपुरात गांजा तस्कर जेरबंद! यशोधरानगर पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गांजा तस्करीत गुंतलेल्या दोन आरोपींना अटक केली. राजीव गांधी नगर, साईबाबा बिछायत केंद्राजवळ छापा मारताना आरोपी शहबाज खान उर्फ बाबू बल्द (23) यांच्या घरातून 720 ग्रॅम आणि 510 ग्रॅम वजनाचे असे दोन पॅकेट मिळून एकूण 1.23 किलो हिरवा ओलसर गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारातील किंमत सुमारे ₹36,900 इतकी आहे.
चौकशीत शहबाजने हा माल आपल्या साथीदार नितीन सोनुले (31) यांच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी विक्रीकरिता मागवला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी नितीनलाही त्याच्या घरी जाऊन अटक केली.
दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार कलम 8(क), 20(ब)(2) आणि 29 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि रमेश खुणे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.


